BTemplates.com

No Copying

Blog Archive

Pageviews

Powered by Blogger.

BTemplates.com

Followers

MarathiBlogs

BlogAdda

Monday, October 17, 2016

लंडनवारी - भाग ४ - लंडन झू, मादाम तुसाँ आणि बकिंगहॅम पॅलेस


आजचा अजेंडा होता लंडन झू आणि मादाम तुसां संग्रहालय. झू ला जाणार म्हणून मुलगा खूश होता. म्हणजे, त्याला बाकी काही कळत नसलं तरी सिंव्ह बघायचा, वाघ बघायचा इतकं समजत होतं. दोन तीन दिवस सेट झालेल्या दिनचर्येप्रमाणे आम्ही उठलो, ब्रेकफास्ट केला आवरलं आणि प्राम, जॅकेट्स, दिवसभराचं सामान, इत्यादी घेऊन निघालो. एव्हाना लंडन ट्यूब च्या मॅपची चांगलीच उजळणी झाली होती. त्यामुळे मेट्रोपोलिटन वरून जुबिली घेऊ तिथून बेकर स्ट्रीट ला उतरू आणि अर्धा तास चाललं की लंडन झू. हे मी अगदी दादर ला उतरू चर्चगेट ट्रेन घेऊ तिने ग्रँटरोडला उतरू आणि थोडं चाललं की आला लॅमिंगटन रोड असं सहज सांगत होतो. (उदाहरणार्थ झालं तरी पुन्हा ते मुंबईचं चित्र डोळ्यासमोर आलंच. रिडिक्युलस. असो.)


 
तर ट्यूबमधे बसलो. अव्याहत सौजन्य सप्ताह असल्यासारखी मंडळी वागताना दिसली इंग्लंडमधे. म्हणजे आमचा जितका म्हणून संबंध येत होता तितक्याच्या आधारावर तरी खूप फ्रेंडली वाटली. ट्रेनमधे प्राम घेऊन चढलं की लगेच प्रायॉरिटी सीट रिकामी होणं वगैरे सुखद धक्के मिळत होते. बेकर स्ट्रीट आलं. आम्ही उतरून गूगल मॅप्स सांगेल तशी पायपीट सुरू केली.  मस्त हिरव्यागार अशा रीजंट्स पार्कमधून हा रस्ता होता. रिजंट्स पार्कच्या एका टोकापासून ते दुसर्या टोकापर्यंत जायला खूप छान वाटलं. मग एकदाचे झू ला पोचलो. लंडनमधे खूप चालायला लागतं! चा रिमाईंडर ठरणारा हा वॉक होता. झू चं तिकिट काढून आमची सैर सुरू झाली.


लंडन झू अपेक्षेपेक्षा खूपच कॉम्पॅक्ट होता. कदाचित शहराच्या मधे असल्यामुळे असेल. पण लंडन झू मधे खरं सांगायचं तर इतकं मोठं तिकिट काढण्यासारखं काही वाटलं नाही. ठीक आहे, म्हणजे मुलासाठी एक अ‍ॅट्रॅक्शन म्हणून सुरेख होतं. पण तेवढंच. तसे झू बरेच बघितलेत पण याची खासियत, आणि तशी ती जनरल लंडन किंवा परदेशातलीच खासियत म्हणायला हवी ती म्हणजे इतकं नीटनेटकं सगळं करून ठेवलेलं आहे, इतकं स्वच्छ आणि नियोजित आहे की फिरायला मजा येते. 'कुठे आलोय चायला!' असं होत नाही. त्यामुळे तोच झेब्रा, तेच पेंग्विन, तोच सिंव्ह असूनही झू एन्जॉय केला. हे झालं आमचं. मुलाला गंमत आली ती वेगळीच. पुस्तकातले प्राणी प्रत्यक्ष दिसल्यावर त्याच्या चेहर्यावर एखाद्या पुस्तकाएवढे भाव उमटले होते. 
मग झू मधेच बसून जरा खादाडी केली. घरून सँडविच इत्यादी पदार्थ घेऊन निघणं लंडनसारख्या ठिकाणी एकदम बेस्ट. एक तर बाहेर खायचे पैसे जरासे वाचतात, आणि मुख्य म्हणजे वेळ वाचतो. तसं मुळात खवय्ये असल्यामुळे ते आणूनही आम्ही बर्यापैकी बाहेरचे पदार्थ खात-पीत होतो. बायकोला बेकिंग प्रिय असल्याने अनेक ठिकाणी मफिन्स, कुकीज इत्यादी खाऊन झालं.


झू मधून पुन्हा रेजेंट्स पार्क पार करून दुसर्या बाजूला आलो. तिथे मेरिलेबोन रोड वर मादाम तुसाँ आहे. बेकर स्ट्रीटपासून अक्षरशः एक दोन मिनिटावर. आम्ही आत गेलो खरे, पण मुलाचा पेशन्स फारच कमी झाला होता, त्यामुळे पटापटा आटपायला लागणार हे समजलं होतं. एक तर तिथे अंधारलेल्या त्या संग्रहालयात बर्यापैकी गर्दी होती. अर्थातच 'आपले' पर्यटक जास्त. त्यात ते पुतळे नीट बघता येणं महाकठीण होतं. पण पुतळ्यांपेक्षा सजीव व्यक्तींना बघूनच जास्त मनोरंजन झालं. विशेषतः बॉलिवूड दालनात. ते पुलंचं वाक्य नाही का, 'आपण कोण आहोत, आपला शैक्षणिक दर्जा काय, एकूण कर्तृत्त्व काय....' त्याप्रमाणे आपण कुठे आहोत, आपण कुणाबरोबर आहोत, मुळात 'आपण' कसे आणि काय आहोत या कशाचीही तमा न बाळगता ते पुतळे सजीवच आहेत असं मानून सगळे प्रकार चालू होते. म्हणजे की, फोटो काढणं (हे अपेक्षितच आहे त्यामुळे त्याचं विशेष नाही), ते फोटो काढताना खांद्यावर हात ठेवणं, कमरेवर हात ठेवणं, मिठी मारणं, अगदी पापे घेणंही चालू होतं. म्हणजे कतरीना कैफ, माधुरी दिक्षित वगैरेंना त्याचा व्हिडियो काढून दाखवला तर झोपेत घाबरून उठतील त्या. असे हे 'चीप बट हिलेरियस' प्रकार आम्ही काही वेळ बघितले. मग संधी मिळेल तसे बायकोने एक दोन फोटो (सामान्य माणसासारखे) काढले आणि आम्ही पुढे निघालो कारण त्या बॉलिवूडी पुतळ्यांमधे मला विशेष रस नव्हता. तसेही एकूण सगळ्या पुतळ्यांपैकी बॉलिवूड किंवा एशियन लोकांचे पुतळे गंडलेले आहेत असं आमचं मत झालं. खपाटीला गेलेले गाल, सुरकुतलेली त्वचा, काँप्लेक्शन मधे काहीच्याकाही फरक, अशी वाट लावलेली आहे आपल्या लोकांची. त्या मानाने सगळ्याच परदेशी व्यक्ती मस्त वठल्यात. लिओनार्डो डी कॅप्रियो, जॉनी डेप, जुलिया रॉबर्ट्स, मर्लिन मॉनरो, विल स्मिथ विशेष. मग स्पोर्ट्स च्या दालनात आर्नल्ड श्वार्झनेगर, रफाएल नदाल, क्रिस्तियानो रोनाल्डो, होसे मुरिन्यो, इत्यादींशी पुतळाभेट घेतली. इथे बेसमेंटमधे शेरलॉक होम्स मिस्टरी बॉक का काहीतरी प्रकार असतो. तिथे जाणार इतक्यात 'समबडी इज अनवेल देअर' असं सांगून सिक्युरिटी वाला सगळ्यांना बाहेर जायला सांगू लागला. त्यामुळे आम्ही थेट एक्झिट कडे रिडायरेक्ट झालो.

माझे नातेवाईक मला बकिंगहॅम ला ऑफिसमधून परस्पर भेटणार होते. त्यामुळे मग ट्यूबने ग्रीन पार्कला गेलो आणि पॅलेस गार्डन्स मधून चालत चालत चिमण्या, कावळे, कबुतरं मुलाला दाखवत आम्ही बकिंगहॅम पॅलेसला पोचलो. चेंज ऑफ गार्डस मधे विशेष असं काही नाही हे आधीच ठरल्यामुळे आम्ही संध्याकाळी तिथे जायचं ठरवलं. मग मस्त संधिप्रकाशात ती ग्रँड इमारत बघितली, इकडे तिकडे जरा फिरलो आणि मग वेस्टमिन्स्टर वरून परतीची ट्यूब पकडली.

आज चांगलीच तंगडतोड झाली होती. त्यामुळे रात्री झोपा पटापट लागल्या. मला सोडून; कारण उद्याचा दिवस माझा होता. पंढरपुराला जायचं होतं, विठठलालाच जणु बघायचं होतं. आय वॉज गोइंग टू मॅन्चेस्टर. मॅचचं काही जमलं नसलं तरी ओल्ड ट्रॅफर्डला जायचं हेच पुरेसं होतं. त्यामुळे गजर वगैरे नीट बघून घेतला, आणि मग विचार करता करताच माझा डोळा लागला.

Saturday, October 8, 2016

Wednesday, October 5, 2016

लंडनवारी - भाग ३ - कॅनलवरचं लॉक आणि साउथ केन्सिंगटन


दुसर्‍या लाँग डे मुळे पुढच्या दिवशी बरीच निवांत जाग आली. आज आम्ही रिकमन्सवर्थ ला जाणार होतो. रिकमन्सवर्थ ही लंडनच्या उत्तर-पश्चिमेला असलेली हर्टफोर्डशायर काउंटीतील जागा आहे. इथे एक अ‍ॅक्वाड्रोम आहे. सुमारे १०० एकर विस्तार असलेला हा एक निसर्गाचा खजिना आहे. इथे एक कॅनल/कालवा आहे ज्याचं नाव ग्रँड युनियन कॅनल. त्यावरील लॉक बघायला आम्ही आज जाणार होतो.


हा लॉक प्रकार फार रोचक असतो. कालव्यातून होणार्‍या जलवाहतुकीला पाण्याच्या पातळीमधील बदल विनासायास ओलांडता यावेत यासाठी या लॉकचा शोध लागला. लॉक ची यंत्रणा ही बोटी पाण्याच्या पातळीनुसार वर किंवा खाली घेण्याचं काम करते. हे एक प्रकारचं चेंबर असतं ज्याला दोन बाजूंना दरवाजे असतात. कालव्याच्या पाण्याची पातळी जिथे बदलते तिथे ही लॉकची यंत्रणा बांधली जाते. कालव्यातून प्रवास करणारी बोट या लॉकजवळ येते तेंव्हा प्रथम त्या बाजूचा दरवाजा उघडून बोटीला चेंबरमधे आणलं जातं. मग तो दरवाजा बंद करून दुसर्‍या बाजूचा दरवाजा हळूहळू उघडला जातो. यामुळे चेंबरमधल्या पाण्याची पातळी कमी/जास्त होते. आणि ती दुसर्‍या बाजूच्या पातळीइतकी झाल्यावत दुसर्‍या बाजूचा दरवाजा पूर्ण उघडून बोट पलिकडे नेली जाते. लॉक या प्रकाराचा शोध लिओनार्डो दा विंची ने लावला, हे विशेष. It's a DaVinci design.


आम्ही गाडी रिकमन्सवर्थ ला पार्क करून तिथल्या हिरवाईतून चालू लागलो. इथेच एक तलावही आहे. तिकडून काहीतरी आवाज येत होता, म्हणून चौकशी केली तर कळलं की तिथे शिडाच्या बोटींची रेस चालू आहे. अनेक सिनियर सिटीझन मंडळी बरेचदा बोट क्लब मधे या रिमोटवर चालणार्‍या शिडाच्या बोटींची रेस खेळतात.


तिथून पुढे चालत चालत आम्ही लॉकजवळ पोचलो. वाटेतल्या हिरवळीवर ठिकठिकाणी बसावं, धावावं असं वाटत होतं पण मोह आवरला. आतापर्यंत लंडनमधे बघितलेली प्रत्येक गोष्ट फोटो काढण्यासारखी होती, आणि लॉकचा परिसरही त्याला अपवाद नव्हता. संथ वाहणारा एक कालवा, दुतर्फा झाडी, त्यावर एक कमानीसारखा पूल, त्या पुलाच्या टोकाला एक टोलेजंग घर, आणि निळंशार आकाश, हे समीकरण इतकं सुंदर होतं की तिथे असलेलं लॉक काही वेळ लक्षातच आलं नाही. मग असं झालं की "ते बघ. याला म्हणतात लॉक", "ओह हे का ते! अच्छा अच्छा..." आणि मग आम्ही ती लॉकची यंत्रणा समजून घेऊ लागलो. थियरीला प्रॅक्टिकलची जोड लगेचच मिळाली. एक लांबलचक प्रायवेट बोट तिथे आली. त्यातला एक माणूस उतरला व गेट उघडणं इत्यादी कामं करू लागला. हे बोटीतल्या व्यक्तीनेच करायचं असतं, त्यासाठी कुणी वॉचमन बिचमन नसतो. तिथे असेलच कुणी तर ते गेट ढकलायला मदत नक्की करतात. आम्हीही त्यानुसार जोर लगाके.... केलं. हे गेट ढकलायला विशेष जोर लागत नाही, ते एक विशिष्ट तंत्र आहे ते जमलं की अजस्त्र वाटणारं ते गेट सहज हलवता येतं. पण ते ढकलताना पायाने जोर घेता यावा यासाठी तिथे लाकडी पट्ट्या जमिनीवर लावलेल्या आहेत जेणेकरून जोर घेणं सोपं जावं, पायाला पकड यावी. बोटीतून किनार्‍यावर जायला जिने केलेले आहेत. छोट्या छोट्या गोष्टी; पण माणसाची सोय प्रत्येक ठिकाणी बघितलेली दिसते. हे वैशिष्ट्य आहे इथलं. इथलंच नव्हे, सगळ्या प्रगत देशांतलं.

 
 लॉकजवळ थोडा वेळ घालवला, फोटो काढले आणि परतीच्या वाटेवर चालू लागलो. आता मात्र गवतावर बागडण्याचा मोह आम्हाला आवरला नाही. मुलाला प्राममधून सोडल्यावर दुडुदुडु करत तो जो पळू लागला, ते बघून आम्हाला भलतं छान वाटलं. मग चांगला तासभर त्याचं गवतावर खेळून झालं. तिथे इतरही कुटुंबं आली होती, लहान मुलं होती त्यामुळे गंमत आली.तिथून मग आम्ही जेवायला एका इटालियन रेस्त्राँ मधे गेलो. अतिशय प्रेमाने वाढणारा, बोलणारा, हसतमुख वेटर आपल्याकडे क्वचित मिळतो. पण या माणसाने खरोखर आमच्या जेवणाची चव वाढवली. अशीही इथल्या पदार्थांची चव क्लास होतीच, पण असं आनंदाने वाढणारं कुणी असेल तर मग ती अजूनच भारी होते. भरपेट जेवून आम्ही घराच्या वाटेला लागलो. दिवस तीन संपला. उद्या साउथ केन्सिंगटन, रॉयल अल्बर्ट हॉल, हिस्टरी म्युजियम इत्यादी बघायचं होतं.

दिवस चौथा. ट्रेनचा पहिलाच प्रवास. पहिल्यांदाच स्टेशन, ऑयस्टर कार्ड, प्रथमदर्शनी किचकट वाटणारा मॅप, हे सगळं आज होतं. स्टेशनवर प्रामसकट दाखल झालो. पहिल्यांदाच असल्याने माझी बहीण आमच्यासोबत आज येणार होती. कार्ड पंच करून फलाटावर आलो. जुबिली, मेट्रोपॉलिटन, सेंट्रल, नि काय काय लाईन्स होत्या. म्हटलं तसं, पहिले किचकट वाटला पण नंतर तो मॅप फिट बसला डोक्यात. या मॅपची गोष्ट अशी की याची संकल्पना एका प्लमरने काढली. आणि हा मॅप पाईप्सच्या जाळ्यासारखा विकसित केला; त्याचं डिझाईन बघता ते लक्षात येतं. शहराच्या विकासात कुणाकुणाचं कसं कसं योगदान आहे याचा हा नमुना.


साउथ केन्सिंगटनला दाखल झालो. लंडनमधे कुठल्याही मोकळ्या जागेत धूम्रपान करायची मुभा आहे. त्याचा फार त्रास झाला पूर्ण प्रवासात. एक सेकंदही तो वास मला सहन होत नाही आणि इथे दर तिसरी व्यक्ती आपली भकाभक धूर सोडत उभी होती स्टेशनबाहेर. त्यात असंख्य कबुतरं होती जागोजागी. ते जरा पक्षांचं आणि माझं वावडं आहे त्यामुळे....
तर हे असं सगळं पार करून केन्सिंगटनच्या रस्त्यांवर आम्ही भटकू लागलो.


इथे अतिशय देखण्या इमारती आहेत. त्या बघताना एक सॉलिड ग्रँड फीलिंग येतं आपल्याला. सोनेरी रंगाच्या पाट्यांवर काळ्या अक्षरांनी लिहिलेली नावं, दारासमोरच्या दोन-तीन पायर्‍या, त्या जिन्याला असलेले नक्षीदार कठडे, इतकंच नव्हे तर दरवाज्यावर असलेलं बेलचं बटणही रॉयल. आहाहा! जाम भारी प्रकार होता सगळा. प्रिन्स अल्बर्ट हॉलकडे आलो. इथे आम्ही आत जाणार नव्हतो; त्यामुळे बाहेरून फेरफटका मारला. एक प्रदक्षिणा केली आणि मग हिस्टरी म्युझियममधे शिरलो. 
म्युझियम बद्दल लिहायला एक धागा पुरायचा नाही त्यामुळे ते लिहीत नाही. पण इतकं सुरेख आणि रंजक आहे त्या म्युझियम मधलं प्रत्येक दालन, की ते प्रेक्षणीय स्थळ न म्हणता अभ्यासाचं स्थळ म्हणायला हवं. 
अर्थातच आम्हालाही वेळ पुरला नाही, शिवाय मग मुलाचाही फिरण्यातला रस संपल्यावर आम्ही दिवस आटपता घेतला. हां; पण पेटपूजा राहिली होती, त्यामुळे हॉटेलात शिरलो. एक वेगवेगळी चीज असलेली डिश आम्ही घेतली होती. इथे चीजबरोबर स्वीट खाण्याची पद्धत आहे. चीजचा फ्लेवर बरेचदा तीव्र असतो त्यामुळे ती टेस्ट न्यूट्रलाईज करायला त्या त्या चीजबरोबर जाणारं विशिष्ट स्वीट तुम्हाला देतात. अशाप्रकारे जिभेचे चोचले पुरवून पुन्हा अंडरग्राउंड आणि बॅक टू होम.


लंडन ट्रिप वॉज गोइंग ग्रेट.

क्रमशः

Saturday, October 1, 2016

लंडनवारी - छोटालं गाव आणि मोठालं शेत


डिस्क्लेमरः लंडनवारीच्या पूर्वतयारीचा भाग वाचून सहाजिक असं मत होताना दिसलं की हा लाईव्ह ब्लॉग आहे आणि प्रवास होत जाईल तसं त्याचं वर्णन येणार आहे. तसा माझा मानस होता खरं तर. आणि म्हणूनच पूर्वतयारीचा भाग मी लगेच लिहिला. परंतु पुढे प्रवासात लिखाणाला वेळ मिळाला नाही त्यामुळे यापुढील भाग हे मी प्रवासानंतर लिहिलेले असतील. तरी या गैरसमजाबद्दल क्षमस्व.

थेट विमानप्रवास असल्याने एक बरं होतं, की मधे उतरा, वेळ काढा हा प्रकार नव्हता. तो असता तरी पाय मोकळे करता येणं वगैरे फायदे असतात, बट थेट जेट इज ऑलवेज ग्रेट. आणि पुढे लंडनला नातेवाईकांकडेच जायचं होतं त्यामुळे अकोमोडेशन नावाचा मोठा प्रश्न उद्भवणारच नव्हता. संध्याकाळी सहा सातच्या सुमारास टर्मिनलमधून बाहेर आलो आणि तापमानातल्या दहाबारा डिग्रीच्या फरकाने सुखावलो. अगदी पाऊस पडून गेल्यासारखी हवा झाली होती. विमानातल्या अपुर्‍या झोपेमुळे रात्री झोप लागायला त्रास झाला नाही. 

लंडनची पहिली सकाळ उजाडली. घड्याळ बघितलं तेंव्हा समजलं की आठ वाजलेत. एरवी हॉर्नचे आवाज किंवा तत्सम गोष्टींनी झोप उडते. इथे खिडकीतून बघितलं तर रस्ता निवांत होता. एखाद दुसरी गाडी निघत होती थोड्या थोड्या वेळाने इतकंच. रस्त्यावर मॅपलच्या झाडाची थोडीफार पानं गळून पडलेली होती, घरांच्या अंगणातल्या फुलझाडांवर रंगीबेरंगी फुलं फुलली होती, एकदम पिक्चर परफेक्ट चित्र होतं. मग गप्पा, गोष्टी आणि आज काय करायचं? या विषयावर चहाचे घोट घेत चर्चा करत बसलो.
सुरुवातीच्या दिवशी नुसतंच जवळपास भटकून आलो. अक्सब्रिज हायस्ट्रीट वर फेरफटका, मॉलमधली टेहळणी, आणि अर्थातच खादाडी अशा अजेंड्याने पहिला दिवस संपला. मुलाला मानवेल अशी थंडी होती, शिवाय स्वेटर, जॅकेट, कानटोपी असा कडेकोट बंदोबस्त आणलेलाच होता. त्यामुळे तशी चिंता नव्हती. फक्त प्राममधे जखडलेल्या अवस्थेत राहण्याची सवयच आम्हाला नसल्याने सारखी त्यातून खाली उतरायची धडपड होत होती. लर्निंग ऑन डे वन असं होतं की लंडनमधे प्रचंड चालायला लागत असल्याने प्रामशिवाय काही खरं नाही हे जरी खरं असलं, तरी त्या प्राममधे बसूनही काही खरं नाही याची कल्पना पुढील प्रवासात ठेवणे.

अक्सब्रिजपासून पुढे वर बेकन्सफील्ड नावाचं एक गाव आहे. या गावात जगातील पहिलं मॉडेल व्हिलेज उभं केलेलं आहे. एखाद्या संपूर्ण गावाची छोट्या आकारातील प्रतिकृती असलेलं हे मॉडेल व्हिलेज बेकन्सकॉट नावाने ओळखलं जातं. आमच्या लंडनवारीच्या दुसर्‍या दिवशीचं हे पहिलं आकर्षण होतं. 

गुडघाभर उंचीची घरं, हाताच्या बोटाएवढी माणसं, छोटाली ट्रेन, अशा गावातून फिरताना कमालीचं सही वाटलं. इथे एक अन एक गोष्ट इतकी बारकाईने केलेली आहे की चकित व्हायला होतं. चर्चबाहेर उभ्या असलेल्या फादरच्या चेहर्‍यावरचे भाव, एखाद्या माणसाच्या कोटाला पडलेल्या चुण्या बिल्डिंगवरच्या पाट्या, पॅलेसबाहेरच्या गाड्या अशा प्रत्येक गोष्टीत प्रचंड बारकावे टिपलेत. अगदी त्या खेळण्यातल्या ट्रेनचा आवाजही खर्‍या ट्रेनसारखा 'धिधिक धिधिक.... धिधिक धिधिक' असा येतो; मोटरवर आहे म्हणून बिनाआवाज किंवा कुई.... असा आवाज वगैरे नाही. परफेक्शन. ते बघताना खरंच एखाद्या गावातून फेरफटका मारतोय की काय असं वाटतं.
त्या मिनिएचर व्हिलेजमधे छानपैकी भटकून झालं. तिथेच एक प्ले एरिया होता. त्यात मग आमच्या मिनिएचरला खेळायला नेलं. घसरगुंडी, बोगदा, इत्यादी ठिकाणी मनसोक्त खेळल्यावर आम्ही बेकन्सकॉटवरून निघालो. डेस्टिनेशन: ऑड्स फार्म, हाय विकम्ब.

नेटवर लंडन अ‍ॅट्रॅक्शन्स बघताना एखाद्या लोकल फार्मला विझिट करणं हा पर्याय बर्‍याच जणांनी सुचवलेला दिसला. ही फार्म्स म्हणजे मोठाली शेतं असतात पण विशेषकरून तिथे असलेले प्राणी हा आकर्षणाचा भाग असतो. गायी, शेळ्या, मेंढ्या, डुकरं, कोंबड्या अशी प्राणीसंपदा तुम्हाला या फार्म्सवर जवळून बघता येते. आपल्याकडेही गोठे, कुकुट पालन केंद्र वगैरे असतात पण आज म्हटलं तर सहज जाऊन हे विश्व बघता येईल अशा जागा आपल्याजवळ नसतात. 
त्यामुळे लंडनला लोकल फार्म विझिट आम्ही करायची ठरवली होती. लांबच्या लांब पसरलेली हिरवळ, त्यावर मुक्त चरणार्‍या अजस्त्र गायी, मेंढ्यांचे कळप, हे बघणं फारच छान वाटलं. इथेही प्रत्येक बाबतीतली टापटीप लपत नव्हती. कोंबड्यांची अंडी घेण्यापासून ते गायीचं दूध काढण्यापर्यंत कामं तुम्हाला इथे बघता, काही करताही येतात. परत इथेही विरंगुळा म्हणून मुलांना, मोठ्यांना खेळता येतील असे खेळ ठेवलेले आहेत. एकंदरित पूर्ण दिवस व्यतीत करता येईल अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे. आम्ही मात्र काही तास तिथे होतो. 

भरपूर मजा करून, दमून, आम्ही घरी परतलो. आणि लंडन भटकंतीचा दुसरा दिवस आटपला.